Ad will apear here
Next
मुलांच्या मनातील असुरक्षिततेची भावना..
अर्चिता तीन वर्षांची झाल्यावर तिला घरच्यांनी शाळेत घातलं आणि पाठोपाठ एका महिन्यात पाळणाघरातही पाठवलं. आधी पूर्ण वेळ घरातच असलेल्या अर्चितासाठी या दोन्हीही जागा नवीन होत्या. तिथलं वातावरण तिच्यासाठी पूर्णपणे नवीन होतं. घरातल्या ज्या वातावरणात, लोकांत तिला सुरक्षित वाटायचं, त्यांच्यापैकी एकही व्यक्ती इथे सोबत नसल्याने तिला असुरक्षित वाटत होतं... ‘मनी मानसी’ सदरात या वेळी पाहू या मुलांच्या मनातील असुरक्षिततेच्या भावनेबद्दल...
.......................................
छोट्या अर्चिताला घेऊन तिची आई व बाबा भेटायला आले. आल्यावर त्यांनी स्वतःची ओळख करून दिली. अर्चिताची आई एका खाजगी कंपनीत कामाला होती. ती सकाळी १० वाजता कामाला जायची ते रात्री आठ वाजता परत यायची. बाबांचंही थोड्या फार फरकाने असंच होतं. त्यांच्याही कामाच्या वेळा खूप जास्त होत्या. अर्चिताचे आजी-आजोबा मात्र घरीच असायचे. ती लहान होती तेव्हा त्यांनी तिला खूप छान सांभाळले; परंतु ती थोडी मोठी झाली आणि मग तिच्या खोड्या, मस्ती, दंगा वाढला. घरभर धावाधाव करणाऱ्या अर्चिताला सांभाळणं, तिच्या मागे धावणं आता आजी-आजोबांना झेपत नव्हतं. 

ती तीन वर्षांची झाल्यावर आई-बाबांनी तिला जवळच्याच एका शाळेत घातलं. सुरुवातीला तिने रडारड केली; पण एकदा रुळल्यानंतर मग ती छान शाळेत जाऊ लागली. एकदा ती शाळेत रुळल्यानंतर आई-बाबांनी तिला पाळणाघरात ठेवण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला आजी-आजोबांनी याला विरोध केला. आम्ही सांभाळू अशी ग्वाहीही दिली, मात्र समजावल्यावर ते तयार झाले. हे ठरल्यानंतर आई तिला रोज पाळणाघरात सोडून जाऊ लागली. शाळेप्रमाणेच पाळणाघरात जातानाही ती काही दिवस रडली, तिथे सोडल्यानंतर दोन-तीन तासांतच, ‘ती खूप रडत आहे तिला घेऊन जा..’ असा पाळणाघरातून फोन यायचा आणि मग अर्चिताचे आजोबा तिला घेऊन जायचे. शाळेप्रमाणे हळू हळू तिला याचीही सवय होईल आणि ती तिथेही रमेल असे सगळ्यांना वाटले होते; मात्र भलतेच घडले. 

महिना उलटून गेला तरी ती रडायची थांबली नाही. उलट आता तर ती शाळेत जाण्यासही नकार देऊ लागली. शाळेचं नाव काढलं, तरी ती रडायला लागायची. बऱ्याचदा, ‘ती रडत आहे तिला घेऊन जा..’ असे फोन शाळेतूनही येऊ लागले. खरं तर पाळणाघर आणि शाळा ही दोन्हीही ठिकाणं छान होती. तिथल्या सुविधाही चांगल्या होत्या. दोन्हीही ठिकाणी अर्चिताला छान सांभाळलं जायचं. तरीही असं का, या सगळ्यामागे काय कारण असावं, हे कोणालाच कळेना. गेल्या पाच-सहा दिवसांपासून तर तिला तापही येत होता. ती खूप आजारी होती. मग आजी-आजोबांनी तिच्या आईला नोकरी सोडायला सांगितली. 

नोकरी सोडण्याची अर्चिताच्या आईची अर्थात तयारी होतीच; परंतु अर्चिता असं का वागत आहे, तिच्या आजारी पडण्यामागचं कारण काय, तिला नेमकं काय झालंय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणं आवश्यक होतं. यासाठी मग अर्चिताचे आई-बाबा भेटायला आले. त्यांनी या सगळ्या घटनांची सविस्तर माहिती सांगितली. ते घाबरले असले, तरीही ही गोष्ट फार काही गंभीर नव्हती. अधिक माहिती घेऊन अर्चिता असं का वागत आहे आणि इतर गोष्टींच्या कारणांचा त्या दोघांना खुलासा केला. 

अर्चिता तीन वर्षांची झाल्यावर तिला घरच्यांनी शाळेत घातलं आणि पाठोपाठ एक महिन्यात पाळणाघरातही पाठवलं. आधी पूर्ण वेळ घरातच असलेल्या अर्चितासाठी या दोन्हीही जागा नवीन होत्या. तिथलं वातावरण तिच्यासाठी पूर्णपणे नवीन होतं. घरातल्या ज्या वातावरणात, लोकांत तिला सुरक्षित वाटायचं, त्यांच्यापैकी एकही व्यक्ती इथे सोबत नसल्याने तिला असुरक्षित वाटत होतं. तिचं हे वाटणं ती रडण्यातून व्यक्त करायची. या सगळ्याचा परिणाम म्हणून मग ती आजारी पडली. 
यावर उपाय म्हणजे अर्चिताला वाटणारी असुरक्षितता कमी केली पाहिजे. त्यानुसार मग तिच्या आई-वडिलांना याबाबत काय करता येईल ते सांगितलं. तिच्या स्वभावानुसार काही गोष्टी तिला वेळोवेळी सांगायच्या, पटवून द्यायच्या, उदाहरणे देऊन सांगायच्या अशा काही युक्त्या केल्या आणि पाहता पाहता अर्चिता पुन्हा छानपैकी शाळा आणि पाळणाघर अशा दोन्ही ठिकाणी जाऊ लागली, राहू लागली, रमली. तिच्या आईलाही नोकरी सोडावी लागली नाही. वेळोवेळी तिच्यात होणाऱ्या बदलांची आई-बाबांनी मला कल्पना दिली आणि त्यानुसार अर्चिताला पुन्हा पाहिल्यासारखी बनवण्यात यशस्वी झालो. 

(केसमधील नावे बदलली आहेत.) 

- मानसी तांबे-चांदोरीकर 
ई-मेल : tambe.manasi11@gmail.com

(लेखिका पुण्यात समुपदेशक म्हणून कार्यरत आहेत.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZIUBM
Similar Posts
मुलांच्या मनातील अस्वस्थता जाणा... सीमाला लहानपणापासून सतत आईबरोबर असण्याची सवय होती; पण आईने सुरू केलेल्या नव्या व्यवसायामुळे त्याच्यात बदल झाला. हा बदल स्वीकारणं सीमाला अवघड जात होतं. त्यातही ती वयाने लहान असल्याने या बदलांमुळे जाणवणारी अस्वस्थता तिच्या या अशा वर्तनातून व्यक्त होत होती... ‘मनी मानसी’ सदरात या वेळी पाहू या मुलांच्या मनातील अस्वस्थतेबद्दल
तुमचं मूल एकलकोंडं होत नाहीये ना? उच्च शिक्षण घेऊन मोठ्या पदावर नोकरीत असणे, म्हणजे आपल्या मुलांना वेळ देण्यापासून सुटका, असे समीकरण हल्ली अनेक कुटुंबांमध्ये मांडले जाताना दिसते. कामासोबतच आपल्या मुलांना पुरेसा ‘क्वालिटी टाइम’ देणे, त्यांच्याशी नियमितपणे संवाद साधणे, याही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. तसे झाले नाही, तर मुले एकलकोंडी होतात
मुले का चिडतात? सोबत असलेल्या मुलांना मारणं, ढकलणं, चावणं, त्यांच्या वस्तू फेकणं, अॅक्टीव्हिटीजला अजिबात न बसणं, हट्टीपणा करणं अशा सीमाच्या अनेक तक्रारींची यादी आईला रोज सगळीकडे ऐकून घ्यावी लागायची. या तक्रारी ऐकून आई काळजीत पडायची. सीमाला समजवायची. सीमा सगळं नीट ऐकायची, शहाण्यासारखं वागेन असंही सांगायची, पण परत तिच्या तक्रारी सुरूच राहायच्या
मुलांच्या वर्तन समस्या लक्षात घ्या.. वर्गात अमेय नावाचा एक मुलगा आहे, जो खूप मारामाऱ्या करतो. मुलांना ढकलणं, ओचकारणं, बुक्क्या मारणं, असं वर्तन तो सतत करतो. वर्गातली सर्वच मुलं त्याला घाबरतात. ‘आम्हाला तो अजिबात आवडत नाही. तो वेडा मुलगा आहे’ असं त्यांच्यातल्या एका छोटीने अगदी ठणकावून सांगितलं... ‘मनी मानसी’ सदरात आज पाहू या मुलांच्या वर्तन समस्यांबद्दल

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language